बाबा
असतील जगात जन्मदाते कित्येक
पप्पा माझे आहेत लाखात एक
न भेद केला कधी मुला मुलीचा
प्रत्येक भाव जाणिला माझ्या मनिचा
सवंगडी म्हणुनी मजसवे खेळले
सखिसारखे हितगुज ग केले
जीवनी खचले मी कित्येक वेळा
जवळी मज केले म्हणुनी
बाळा
जेव्हा मज संकटांनी घेरले
जावुनि त्यांच्या कुशीत निजले
दिला मग तेव्हा त्यानी उबारा
दुसरा काय पिल्लाला हवा आसरा
पिल्लू ग मी त्यांचे चिमुकले
पंखांखाली मायेच्या भय सम्पले
म्हणतात मज आता ते मार भरारी
सोडूनि कसे जावे शल्य हेच उरी
घरट्याकडे नजर जाई वेळोवेळी
पडले बाहेर घरट्यातून कधी काळी
हसत मज निरोप देता डोळे पुसतात वळुनी
मला म्हणे न रडता जा पाहु उडुनी
कोण मायेने पांघरेल मज
कोण म्हणेल ये बाळ कुशीत निज
मानते मी त्यानाच सर्वकाही
त्याजागी मजला दूजे कुणी नाही
भाव हे सारे आठवूनी
येते भरुनी पाणी नयनीं
प्रत्येक जन्मी मिळो मज हेच पप्पा
एकच प्रार्थिते तुज देवबाप्पा ! ! !
===============================================
बाबा रिटायर होतोय
बाबा रिटायर होतोय
आज माझंच मला कळून चुकलं,
मलाच नातं नीट जपता नाही आलं.
आज जेवून झाल्यावर बाबा बोलला,
"मी आता रिटायर होतोय,
मला आता नवीन कपडे नको,
जे असेल ते मी जेवीन,
जे असेल ते मी खाईन,
जसा ठेवाल तसा राहीन."
काहीतरी कापताना सुरीने बोट कापलं जावं,
आणि टचकन पाणी डोळ्यात यावं,
काळीजच तुटावं, अगदी तसं झालं.
एवढंच कळलं कि आजवर जे जपलं ते सारंच फसलं.
का बाबाला वाटलं तो ओझं होईल माझ्यावर ?
मला त्रास होईल जर तो गेला नाही कामावर ?
तो घरात राहिला म्हणून कोणी ऐतखाऊ म्हणेल,
कि त्याची घरातली किंमत शून्य बनेल.
आज का त्याने दम दिला नाही,
"काय हवं ते करा माझी तब्बेत बरी नाही,
मला कामावर जायला जमणार नाही."
खरंतर हा अधिकार आहे त्याचा सांगण्याचा,
पण तो काकुळतीला का आला?
ह्या विचारातच माझं मनं खचलं.
नंतर माझं उत्तर मला मिळालं,
जसा जसा मी मोठा होत गेलो,
बाबाच्या कवेत मावेनासा झालो.
नुसतं माझं शरीर वाढत नव्हतं,
त्याबरोबर वाढत होता तो अहंकार,
आणि त्याने वाढत होता तो विसंवाद,
आई जवळची वाटत होती,
पण बाबाशी दुरावा साठत होता.
मनाच्या खोल तळापर्यंत प्रेमच प्रेम होतं,
पण ते शब्दात सांगताच आलं नाही,
बाबानेही ते दाखवलं असेल,
पण दिसण्यात आलं नाही.
मला लहानाचा मोठा करणारा बाबा,
स्वःताच स्वतःला लहान समजत होता.
मला ओरडणारा - शिकवणारा बाबा,
का कुणास ठाऊक बोलताना धजत होता.
मनाने कष्ट करायला तयार असलेल्या बाबाला,
शरीर साथ देत नव्हतं,
हे त्या शून्यातून सारं उभं केलेल्या तपस्वीला,
घरात नुसतं बसू देत नव्हतं.हे मी नेमकं ओळखलं.
खरंतर मी कामावर जायला लागल्यापासून,
सांगायचच होतं त्याला कि थकलायेस आराम कर, पण
आपला अधिकार नव्हे सूर्याला सांगायचा कि “मावळ आता”.
लहानपणीचे हट्ट पुरवणारा बाबा,
मधल्या वयात अभ्यासासाठी ओरडणारा बाबा,
आणि नंतर चांगलं
वागण्यासाठी कानउघडणी करणारा बाबा,
आजवर सारं काही देऊन कसलीच अपेक्षा न ठेवता,
जेव्हा खुर्चीत शांत बसतो,
तेव्हा वाटतं कि काही जणू आभाळंच खाली झुकलं.
आज माझंच मला कळून चुकलं.
— I love my dad
====================================================
ती माझी मुलगी
ती माझी मुलगी ...लग्न होऊन गेली
घरातली सारी किलबिल बरोबर घेऊन गेली..
माझ्या डोळ्यांपुढची वाट सगळी धुकं धुकं झाली
तिची मांजरी, तिची पुस्तकं, तिची वाद्यं, तिची घुंगरं
लाडके कपडे आणि पत्रं, तिचे फोटो .. तिची चित्रं
कुणी गात नाही... कुणी हसत नाही..
सगळ्यांना जातांना स्टॅच्यू म्हणून गेली..
ती माझी मुलगी ...लग्न होऊन गेली....
घरातली सारी किलबिल बरोबर घेऊन गेली
इवली असल्यापासून इथे तिचंच राज्य होतं
जरा कुठे गेली की घर कावरं बावरं होत होतं
तिचं बोलणं, तिचं हसणं, रागाने कधी तणतण करणं
तिचं गाणं तिचं हसणं, मनापासून चित्र काढणं
तिच्यामुळे आमच्या घरची मैफल रंगत गेली..
ती माझी मुलगी ...लग्न होऊन गेली....
घरातली सारी किलबिल बरोबर घेऊन गेली
आमच्या गप्पा, आमची गुपितं, आमचा स्वयंपाक, बाहेर जाणं
आमच्या टिंगली, आमची भांडणं, चिडवाचिडवी, खरेद्या करणं
स्वप्नं, चिंता, वैताग सांगणं, एकमेकींना घडवत राहणं
पोकळी होणं म्हणजे काय याची समज आली..
ती माझी मुलगी ...लग्न होऊन गेली....
घरातली सारी किलबिल बरोबर घेऊन गेली
बावीस वर्ष मुलगी आपल्याला किती काय काय देते
वाढत्या वयात किती गोष्टी प्रेमाने शिकवत राहते
माया देते, धीर देते, आपल्यासाठी तीच कळवळते
ओह्हं कसलं ? फुलपाखरू ते याची जाण झाली..
ती माझी मुलगी ...लग्न होऊन गेली....
घरातली सारी किलबिल बरोबर घेऊन गेली
तिच्या माझ्या धाग्यांचं एक नातं विणलं आहे
तिचे वेगळे, माझे वेगळे रंग घेणार आहे
नवं नातं विणण्यात आता ती गुंतली आहे
त्याचे रंग सुंदर वेगळे, मला कळतं आहे
एकमेकींना दुर्मिळ झालो याची जाणीव झाली..
ती माझी मुलगी ...लग्न होऊन गेली....
घरातली सारी किलबिल बरोबर घेऊन गेली
===================================================================
Good Morning Love Kavita in Marathi - गुड मॉर्निंग मेसेज मराठी - गुड मॉर्निंग फोटो मराठी
ReplyDelete