प्रेरणादायी कविता
डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम

निर्मळ वाचा
विज्ञान भक्ती
अवकाशी प्रेरणा
प्रेमळ व्यक्ती
विलक्षण बुद्धी
मार्मिक विचार
हाती दानत
मुखी आधार
मृदु स्वभाव
संवेदनशीलता
देश प्रेमाशी
एकनिष्ठता
कठोर परिश्रम
थोर नेतृत्व
सखोल अभ्यास
अद्वितीय कर्तुत्व
नव्या पिढीशी
विचार मंथन
स्वप्नाळू डोळ्यांना
अविरत समर्थन
या जाज्वल्य पार्वाला
भारताचा सलाम
स्वतंत्रता दिवस
घडतोय बदल
चढतेय वीटेवर वीट
मिटतेय गुलामी
आपण होतोय धीट
उठत आहेत प्रश्न
कुरवाळतोय शंका
अन्यायाविरुद्ध
कुणी वाजवतोय डंका
पसरतेय महिती
हक्कासाठी भांडतोय
उलट सुलट का होईनात
आपण विचार मांडतोय
घडवितोय देश आपला
अंतराळी इतिहास
उद्याच्या चैतन्यावर
दृढ होतोय विश्वास
कोपर्यातल्या झोपडीमध्ये
प्रगतीची इच्छा दिसतेय
पुस्तकाच्या बाजारातही
आशेची पालवी रुजतेय
भारतीय असण्याचा वाटे
मनापासून अभिमान
बलाढ्य सुंदर समृद्ध स्वतंत्र
माझा भारत देश महान
आयुष्याचा भागीदार
तिच्या दिशेने पावलं
आपोआप माझी वळतात
मलाही उमजेना अशा
वाटेला भावना कळतात
भव्यतेची ओढ मला
स्वप्नं माझी साहसी
झोका घेता आकाशी भिडे
ती ही आहे धाडसी
पुस्तकांचे ओझे माझे
ती लिलया पेलेल का?
झेप घेऊनी धडपडलो
तर ती मला झेलेल का?
नेम अचूक स्थैर्य तिच्या हाती
तीक्ष्ण विचारांचे बाण
सोसेल का तिच्या बुद्धीला
माझ्या धनुष्याचा ताण
खळाळते हास्य तिचे
नम्रतेचा शृंगार
तिच्या तेजस्वी डोळ्यात दिसे
मला आयुष्याचा भागीदार
ध्यास
जरी मी संपलो इथे
प्रवास संपणार नाही
चार लाकडांसोबत
माझा ध्यास जळणार नाही
राख निजेल मातीच्या कुशीत
स्वप्ने निजणार नाही
राहतील रेंगाळत येथेच
पण सावली दिसणार नाही
अगणित आकांशा
क्षणात संपत नसतात
पेटतात मंद चांदण्यांसारख्या
पेटतात तेजस्वी ताऱ्यांसारख्या
मावळतील दिवे
अंधार पसरेल चहुबाजू
सायंकाळ येईल
काळे वस्त्रे परिधान करून
त्याच क्षणी
सूर्य उगवलेला असेलच कोठेतरी
त्याची आग विझणार नाही
विझलेली मशाल
पुन्हा पेटवतील
असंतोषाचे हात
होईल सुरु
एक नवा प्रवास
तीच वाट धरून
पोहोचेल तो
परिवर्तनाच्या क्षितिजावर
तोपर्यंत त्याची पापणी
तुफानातही लवणार नाही
निरतिशय व ओतप्रोत भावनेने अतिशय मनमोहक आणि आकर्षक कविता लिहिली आहे
ReplyDeleteGood Morning Love Kavita in Marathi - गुड मॉर्निंग मेसेज मराठी - गुड मॉर्निंग फोटो मराठी
ReplyDelete