प्रेम कविता

 

आयुष्याचा भागीदार

 

तिच्या दिशेने पावलं
आपोआप माझी वळतात
मलाही उमजेना अशा
वाटेला भावना कळतात
भव्यतेची ओढ मला
स्वप्नं माझी साहसी
झोका घेता आकाशी भिडे
ती ही आहे धाडसी
पुस्तकांचे ओझे माझे
ती लिलया पेलेल का?
झेप घेऊनी धडपडलो
तर ती मला झेलेल का?
नेम अचूक स्थैर्य तिच्या हाती
तीक्ष्ण विचारांचे बाण
सोसेल का तिच्या बुद्धीला
माझ्या धनुष्याचा ताण
खळाळते हास्य तिचे
नम्रतेचा शृंगार
तिच्या तेजस्वी डोळ्यात दिसे
मला आयुष्याचा भागीदार


प्रेमाचे वादळ

ठरवून पण सहजपणे
माझ्या बाजूला बसतो
छोट्याशा विनोदावरही
जोरजोरात हसतो
कळतय मला
कळतय मला हास्यात तुझ्या
काय लपून बसलय
घाबरु नको मी ही मनात
तसच काहीसं जपलय
न संपण्यार्‍या गप्पांचं मी
पांघरुण घेऊन निजते
तुझी हुशारी उत्तरात नाही
प्रश्नांमध्ये दिसते
आत्मविश्वासाने नटलेला
स्वभाव मोहक रहस्यमय
सारखा तुझा उल्लेख ओठी
हवीहवीशी तुझी सवय
विश्वासार्ह न्यायबुद्धी
वर्तनातही सभ्यता
हात तुझ्या हाती देता
मनी लाभली शांतता
आरशाने पहिल्यांदा माझ्या
डोळ्यात भरले काजळ
नव्हती ही झुळुक मैत्रीची
होते प्रेमाचे वादळ

न सापडलेलं प्रेम

 

क्षणात एका टोचलेलं
खोल दरीत पोहोचलेलं
तिथेच डुंबत बसलेलं
न बोलता रुसलेलं
ओठात कधी मिटलेलं
कागदास कधी भेटलेलं
पापणीच्या आड हसलेलं
मनात माझ्या वसलेलं
उशीच्या कुशीत निजलेलं
स्वप्नाळु जगात सजलेलं
असून सुद्धा नसलेलं
पण आरशात मात्र दिसलेलं
न सापडलेलं प्रेम...

आजकाल मी एकटाच राहतो
आजकाल मी एकटाच राहतो
एकटा राहण्यात पण
एक वेगळीच मजा आहे

सुख नसले खूप तरी
आयुष्यातून
दुखः तेवढा वजा आहे

एकदा सवय झाली की
एकटेपणा पण खाणार नाही

दिलं जरी काही नाही एकटेपणाने,
पण मला सोडून तरी जाणार नाही

 

माझे तुझ्यावर प्रेम आहे हे
मी तुला रोज सांगणार आहे
कधी माझे प्रेम स्वीकारशील
तो पर्यंत मी वाट बघणार आहे

पहिले मी जेव्हा तुला
फक्त तूच दिसत होतीस
जिथे तिथे मी पाहावे
फक्त तूच भासत होतीस..

माझ्या नजरेपासून दूर जरी गेलीस
तुझ्याबरोबर मीही चालणार आहे
कधी माझे प्रेम स्वीकारशील
तो पर्यंत मी वाट बघणार आहे

प्रेमाला प्रेमाने जिंकता येते
अशीच मला आशा आहे
प्रेम दिल्याने वाढत जाते
हीच प्रेमाची भाषा आहे

प्रेमाला फक्त प्रेम द्या हेच
मी सर्वाना सांगणार आहे
कधी माझे प्रेम स्वीकारशील
तो पर्यंत मी वाट बघणार आहे
 
 

 

 



 


 


 

 

1 comment: