दृक श्राव्य कविता

मज दिसत नाही चांदणे

घनघोर कोसळती या वसुंधरेवर
पर्जन्याचे झरे
मज दिसत नाही चांदणे
मज दिसत नाही चांदणे
या वेलीवरती कोणी फेकले हिरे
हा वारा कसा स्वच्छंद होऊन फिरे
मज दिसत नाही चांदणे
आल्या धावत बघ या सरी
हसल्या त्या मंजिरी
नेसली धरेने हिरवी पैठणी
वासरू कसे हे बागडे
मज दिसत नाही चांदणे
अंबरी हे नृत्य ढगांचे
पायी लेवूनी पैजण विजांचे
नभी सजल्या मैफिलीतले
निसर्ग गातो अद्‍भूत गाणे
मज दिसत नाही चांदणे
काळोख असा हा थरारणारा
वार्‍यासंगे देइ शहारा
लपुनी पाहते हे नजराणे
मज दिसत नाही चांदणे
मज दिसत नाही चांदणे

अमृत

 

सुकलेल्या धरणीला
ओलाव्याची फुंकर
हलकेच वितळते पहा
वियोगाचे डोंगर
नजरेत मावेना
रिमझिमणारा आनंद
श्वासासही जाणवला
मोकळेपणाचा सुगंध
खेळते गीत मधुर
हास्याशी लपंडाव
वादळे पार करूनी झाला
मायेचा वर्षाव
हाताच्या रेषेवरी जसा
तुषार तो नाचतो
शीतल वारा कानात माझ्या
खुदकन हासतो
मोहरलेल्या ओंजळीतले
थेंब ओठाने मोजले
ताहानलेल्या पाखराला
मेघाने अमृत पाजले

माणूस

माणूस म्हणून जन्मलेला माणूस
माणसासाठी जगत असतो
आपल्या सिमित आयुष्याला
नवे अर्थ लावत असतो
मनातल्या लहरींवर स्वार होऊन
माणसांच्या समुद्रात पोहत असतो
एखाद्या मोठ्या लाटे खाली
चिंब चिंब भिजत असतो
किनार्‍यावर असतांना तो
त्याच लाटेची वाट पहातो
इतर लहान लहरी आल्या
तरी तिथेच बसून टिपं गाळतो
रागावलेल्या माणसालाही
सागराकडेच जावं लागतं
दुसर्‍या माणसांच्या लहरींनाही
आपल्या कवेत घ्यावं लागतं
माणसाचा हात धरून
चालणारा माणूस मी
हरवलेल्या लाटेला
शिधणारा माणूस मी
खडकावर आदळूनही
खिदळणारा माणूस मी
बर्फासारखा थंड तरी
पिघळणारा माणूस मी
क्षितिजावरील आकांशांकडे
पोहणारा माणूस मी
रोज मावळत्या सूर्यासंगे
उगवणारा माणूस मी

1 comment: